लीड्सच्या चिप्स – १२ रस्त्यामधील पुतळे

महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांचे असंख्य पुतळे आपल्याला भारतातील गांवोगांवी चौकाचौकांमध्ये दिसतील. छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ किवा इतर मुद्रांमधील पुतळे महाराष्ट्रात अनेक गांवी मोक्याच्या ठिकाणी आहेत. चौपाटीवरील सरदार पटेल व दादर येथील थोर साहित्यिक राम गणेश गडकरी अशा इतर मान्यवरांचे पुतळे कांही सार्वजनिक ठिकाणी उभारले आहेत. पण केवळ शोभेसाठी रस्त्याच्या कडेला किंवा चौकात उभे केलेले पुतळे त्या मानाने कमीच आहेत. बोरीबंदरचे रेल्वे स्टेशन किंवा फ्लोरा फाउंटन वगैरे ठिकाणी ब्रिटीशांच्या कारकीर्दीत जे कांही पुतळे उभारलेले असतील त्यात स्वातंत्र्यानंतर फारशी भर पडलेली दिसत नाही. फ्लोरा फाउंटनचे हुतात्मा चौक असे नामकरण केले त्या वेळेस तेथे हुतात्म्यांचे स्मारक बांधले गेले तेवढेच एक उल्लेखनीय वाटते. थोर व्यक्तींचे दर्शन घडतांना त्यांचे चरित्र व त्यांची शिकवण याची आठवण व्हावी असा एक उद्देश त्यांचे पुतळे उभारण्यामागे असतो तो कितपत साध्य होतो हे माहीत नाही. मात्र हल्ली कांही समाजकंटक एखाद्या पुतळ्याचा अवमान करतात व त्यातून दंगे धोपे, सामाजिक तेढ वगैरे निर्माण होतात हा एक नवाच प्रश्न उभा राहिला आहे.

लीड्सच्या रस्तोरस्ती इतके पुतळे दिसतात की आपल्याला त्याला पुतळ्यांचे शहर म्हणावेसे वाटेल. कदाचित इंग्लंडलाच पुतळ्यांचा देश म्हणता येईल. यांत वेगवेगळ्या क्षेत्रांतील थोर वंदनीय विभूती तर आहेतच पण पौराणिक काल्पनिक संकल्पना, इतिहासकालीन व्यक्ति, सर्वसामान्य माणसांच्या जीवनातील प्रसंग, कलात्मक शिल्पकृति अशा अनेक प्रकारचे पुतळे तेथे सार्वजनिक जागी पहावयास मिळतात.   कधीही कोणी त्यांची पूजा करतांना दिसत नाही आणि त्यांची अवहेलना करायचा उपद्व्यापही कोणी करत नाही.  जी चांगल्या प्रकारची स्वच्छता तिकडल्या सगळ्या सार्वजनिक ठिकाणांमध्ये एकंदरीतच बाळगली जाते तिला अनुसरून या स्मारकांचीही वेळोवेळी झाडलोट आणि पुसापुशी होत असते.

लीड्सच्या सिटी स्क्वेअर या मुख्य रेल्वेस्टेशनसमोरील चौकात मधोमध मोक्याच्या जागी असाच एक पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा आहे.  तो ब्लॅक प्रिन्स या नांवाने ओळखला जातो.  या राजकुमाराचा लीड्स शहराशी कांहीच संबंध नव्हता.  इतिहासात गौरवपूर्वक नोंद व्हावी असे कसलेच मोठे कार्य त्याने केले नाही. ट्रॅफिक सिग्नलवर थांबलेल्या अनेकांना “कोण तो कुठला राजकुमार? ” असे मी विचारले. पण बहुतेक सर्वसामान्य लीड्सवासियांना त्याच्याबद्दल कांहीसुध्दा माहिती नाही. त्यामुळे त्या पुतळ्याच्या दर्शनाने कोणाला स्फूर्ती मिळेल किंवा कोणाच्या मनात देशभक्ती जागृत होत असेल अशी सुतराम शक्यता दिसत नाही. त्या गजबजलेल्या चौकातून रोज जाणारे हजारो स्थानिक लोक मान वर करून त्याच्याकडे पहात सुध्दा नाहीत. आपल्याकडील मुंबईतल्या म्यूजियमजवळचा काळा घोडा आता पूर्णपणे अज्ञातवासांत गेला असला तरी लीड्सचा हा ब्लॅक प्रिन्सचा पुतळा मात्र आजसुध्दा आपल्या जागी दिमाखाने उभा आहे. शहराला भेट देणारे पर्यटक एक देखणी शिल्पकृती म्हणून त्याचेकडे कौतुकाने बघतात.  त्याच्या आजूबाजूला उभे राहून फोटो काढून घेतात आणि पुढे जातात. याच चौकात रस्त्याच्या कडेकडेने हातात दिवा घेऊन उभ्या असलेल्या आठ पूर्णाकृती निम्फ्सचे पुतळे आहेत.  मनुष्याला मोह पाडणा-या एक प्रकारच्या अप्सरा असे त्यांना म्हणता येईल. त्याशिवाय सुप्रसिध्द शास्त्रज्ञ जोसेफ प्रीस्टली व आणखी एक दोन मोठ्या व्यक्ति सुध्दा तिथेच दाटीवाटीने उभ्या आहेत.

तेथील आर्ट गॅलरीसमोर आधुनिक शैलीचे सुप्रसिध्द शिल्पकार हेन्री मूर यांनी निर्माण केलेली एक भव्य शिल्पकृती ठेवलेली आहे तर मिलेनियम स्क्वेअर या प्रदर्शने, मेळावे वगैरे भरवण्याच्या जागेच्या बाजूला असलेल्या ऐतिहासिक वास्तूच्या समोर दोन उंच स्तंभ उभारून त्यावर सोनेरी घुबडांच्या आकर्षक प्रतिमा ठेवल्या आहेत. घुबड हे येथील प्रतीक असून त्याची आकृती जागोजागी दिसते. लीड्स ब्रिजवर सुध्दा हे चिन्ह ठळकपणे कोरले आहे.  आर्ट गॅलरीसमोरच व्हिक्टोरिया क्रॉस या ब्रिटनमधील सर्वोच्च बहुमानाने सन्मानित केल्या गेलेल्या लीड्स येथील सर्व वीरांचे स्मारक आहे. दिल्लीच्या शहीद स्मारकासारख्या उभ्या मनो-याच्या पायथ्याशी एका सैनिकाचा पुतळा व माथ्यावर एक सुंदर पंखधारी परी असे त्याचे स्वरूप आहे.  अठराशे सत्तावन पासून दुस-या महायुध्दापर्यंत अनेक लढायांमध्ये मर्दुमकी गाजवलेल्या सा-या शूरवीरांची नांवे बाजूला एका शिलालेखावर कोरून ठेवली आहेत. इथे मात्र अनेक पुष्पचक्रे अर्पण केलेली दिसतात. 

याशिवाय ब-याचशा चर्चच्या समोर क्रूसावरील येशूच्या प्रतिमा आहेत. क्वचित कुठे माता मेरी आहे. जुन्या इमारतींच्या आत किंवा दर्शनी भागावर सजावटीसाठी मांडून ठेवलेल्या आणि वस्तुसंग्रहामधील पुतळ्यांची तर गणनाच नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: