जन्मतारीख – भाग ४

माझ्या लहानपणी जन्मतारखेला जसे फारसे महत्व नव्हते, तसेच आमच्या जीवनात शुभेच्छांचा प्रवेशसुद्धा अजून झाला नव्हता. आम्ही संक्रांतीला आप्तेष्टांकडे जाऊन त्यांना तिळगूळ देत असू आणि दसऱ्याला सोने. दिवाळीला तर एकमेकांच्या घरी जाऊन फराळ झोडणे हेच मुख्य काम असे. या सगळयांबरोबर आणि इतर वेळांसुद्धा वडीलधाऱ्यांना वाकून नमस्कार करायचा आणि त्यांनी प्रेमाने थोपटून आशीर्वाद द्यायचे यातच सर्व शुभेच्छा, सदीच्छा वगैरे येत असत. लहान मुलाने मोठ्या माणसाकडे जाऊन त्याला “देव तुमचे भले करो” वगैरे म्हणणे हा तर फारच चोंबडेपणा झाला असता. आता काळ बदलला आहे. माझ्या नातवंडांच्या वयाची मुले मला नेहमी “हॅपी अमुक तमुक डे” असे ‘विश’ करतात आणि मी अत्यंत आनंदाने व कौतुकाने त्या सदीच्छांचा स्वीकार करतो.

आमच्या लहानशा गांवात दुसऱ्या कोणाला पत्र लिहून पाठवणारा माणूस वेडाच ठरला असता. त्याला अपवाद एकाद्या प्रेमवीराचा असेल; पण तोही एक प्रकारचा वेडाच झाला ना! परगांवाहून आलेली पत्रे टपालखाते इमाने इतबारे घरपोंच आणून देत असे. त्या काळांत दाराला टपालपेटी लावलेली नव्हती आणि मुळांत दरवाजाच दिवसभर उघडा असे. पोस्टमन त्यातून दहा पावले चालत आंत यायचा आणि सोप्यामध्ये बसलेल्या व्यक्तीच्या हांतात अदबीने पत्रे द्यायचा.

अमीन नांवाचा एकच वयस्कर पोस्टमन मी अगदी लहान असतांना वर्षानुवर्षे आमच्या घरी पत्रे द्यायला येत असल्यामुळे तो  घरच्यासारखाच झाला होता. तो कितव्या इयत्तेपर्यंत शाळा शिकला होता आणि त्याला कोणकोणत्या भाषा वाचता येत होत्या कुणास ठाऊक. त्याला पत्तादेखील वाचायची गरज वाटत नसे. फक्त नांव वाचल्यावर ती व्यक्ती कुठे राहते ते त्याला समजायचे. “मजमूँ भाप लेते हैं लिफाफा देखकर” असे हुषार माणसाबद्दल म्हणतात. या अमीनला सुद्धा पत्र हांतात देतादेताच त्यातल्या मजकुराची कल्पना येत असावी. एखादे लग्न ठरल्यासारखी गोड बातमी आणल्याबद्दल त्याचे तोंड गोड केले जायचेच. क्वचित प्रसंगी वडिलपणाच्या अधिकाराने तो दोन शब्द बोलून धीरसुद्धा देत असे. पण त्याने आणलेल्या पत्रात कधीसुद्धा एकादे ग्रीटिंग कार्ड पाहिल्याचे मात्र मला आठवत नाही. त्या काळात ग्रीटिंग कार्ड पाठवायची प्रथा अजून सुरू झालीच नव्हती.

आमचा पोस्टमन कितीही कर्तव्यदक्ष असला तरी त्या काळांतली दळणवळणाची साधने फारच तुटपुंजी होती. त्यातही वादळवारे, पाऊसपाणी यांमुळे व्यत्यय येत असे. त्यामुळे एका गांवाहून दुसऱ्या गांवी पत्र कधी जाऊन पोंचेल याचा नेम नव्हता. तांतडीचा संदेश पाठवण्यासाठी तारेची सोय होती. त्यासाठी येणारा खर्च त्यातील शब्दांच्या संख्येप्रमाणे वाढत असल्यामुळे तार पाठवण्यासाठी एक संक्षिप्त भाषा प्रचारात आली होती. त्यात अव्यये व विशेषणे तर नसतच, कधीकधी क्रियापददेखील गाळले जात असे. बहुतेक तारांमध्ये “अमका गंभीर” नाही तर “तमका दिवंगत” आणि “ताबडतोब निघा” अशाच प्रकारचे संदेश असल्यामुळे तार वाटणाऱ्या पोस्टमनची सायकल कोणाच्या दाराशी उभी राहिलेली दिसली की गल्लीत कुजबुज किंवा रडारड सुरू होत असे. तो कोणाच्या घरी पाणी प्यायला गेला असला तरी तो बाहेर पडलेला दिसतांच सांत्वन करण्याच्या उद्देशाने तिथे गेलेले लोक “या यमदूतापासून चार हांत दूर रहा” असा सल्ला त्या घरातल्या लोकांना देत असत. क्वचित कधीतरी परगांवी कोणाच्या घरी झालेल्या अपत्यजन्माची शुभवार्ता येई आणि तिथली मंडळी उत्साहाने बाळंतविडा तयार कराच्या कामाला लागत. उच्च शिक्षण किंवा नोकरीसाठी पहिल्यांदाच घराबाहेर पडणाऱ्या मुलांना त्यांच्या माता पोटाशी कवटाळून निरोप देतांनाच “पोचल्याची तार कर” असे सांगत, त्यामुळे “सुखरूप पोंचलो” अशा मजकुराच्या तारा येऊ लागल्या आणि तारेबद्दल मनात वाटणारी धास्ती कमी झाली.

हे ठराविक मजकुरांचे संदेश कडकट्ट करीत पाठवणाऱ्या लोकांना त्याचा कंटाळा आला असावा किंवा त्यांना पुरेसे काम नाही असे त्यांच्या अधिकाऱ्यांना वाटले असावे, यातल्या कोठल्याशा कारणाने तारेमधून शुभेच्छासंदेश पाठवण्याची योजना सुरू झाली. परीक्षेतील यश, नोकरी वा बढती मिळणे, विवाह, अपत्यप्राप्ती अशा घटना आणि दिवाळी, ईद, ख्रिसमस वगैरेनिमित्त पाठवायचे पंधरा वीस संदेश लिहून त्याला क्रमांक दिले गेले आणि आपण फक्त तो क्रमांक लिहिला की तो वाक्य लिहिलेली तार पलीकडच्या माणसाला मिळत असे. पोस्टऑफीसात वर्षानुवर्षे धूळ खात पडून मळकट झालेल्या पांढऱ्या कागदाऐवजी फुलापानांची चित्रे असलेल्या आकर्षक रंगीबेरंगी कागदावर हा बधाईसंदेश दिला जात असे. या नाविन्यामुळे म्हणा किंवा एका शब्दाच्या खर्चात अख्खे वाक्य पाठवण्याचे समाधान मिळत असल्यामुळे म्हणा, हे संदेश बरेच लोकप्रिय झाले. त्यांमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करणारा संदेशसुद्धा असावा, पण मला तो मिळण्याचे भाग्य प्राप्त झाले नाही. ज्या काळात तारांद्वारे संदेश पाठवणे सुरू झाले तेंव्हा कोणालाच माझी जन्मतारीख माहीत नव्हती आणि जेंव्हा तिला महत्व आले तोपर्यंत तार पाठवणेच कालबाह्य झालेले होते.

टेलीफोन या शब्दाला दिलेला ‘दूरध्वनी’ हा मराठी प्रतिशब्द जरी ‘तार’ या शब्दाप्रमाणे बोलीभाषेत रूढ झाला नाही तरी संदेशवहनाचे हे माध्यम मात्र तारेपेक्षा सहस्रावधीपटीने अधिक लोकप्रिय झाले. संदेश पाठवून त्याचे उत्तर येण्याची वाट पहात बसण्यापेक्षा परस्पर संवाद साधणे कितीतरी चांगले असते आणि तेही घरबसल्या होत असेल फारच उत्तम! त्यामुळे टेलीफोनचा विकास आणि प्रसार झपाट्याने झाला. माझ्या संपूर्ण आयुष्यात जेवढ्या तारा मला मिळाल्या असतील किंवा मी पाठवल्या असतील त्यापेक्षा अधिक वेळा हल्ली रोजच फोनवर बोलणे होते. त्यात घरी कोणाचा जन्मदिवस असेल तर विचारायलाच लको. कधीकधी एका हांतात एक रिसीव्हर आणि दुसऱ्या हांतात सेलफोन घेऊन एकदम दोघादोघांशीसुद्धा कधीकधी बोलावे लागते. एकदा माझ्या जन्मतारखेला मी पुण्यात होतो. तरीही अनेक लोकांनी माझ्या ‘जेथे जातो तेथे सांगाती’ येणाऱ्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला तर कांही लोकांनी प्रयत्नपूर्वक पुण्याचा लँडलाइन नंबर मिळवला. उरलेल्या लोकांचे ध्वनिमुद्रित केलेले संदेश आन्सरिंग मशीनवर दुसरे दिवशी मुंबईला गेल्यावर ऐकायला मिळाले. म्हणजे एकूण एकच!

घरातल्या संगणकाचे बोट धरून आपला आंतर्जालावर प्रवेश झाला आणि संदेशवहनाचे एक आगळेच दालन उघडले. टेलीफोनची सुविधा सुलभ झाल्यानंतर टपालाने पत्रे पाठवणे कमीच झाले होते. नव्या पिढीच्या मुलांना तर पत्रलेखनाची कलाच फारशी अवगत झाली नसेल. पण ईमेल सुरू होताच कधीही पत्र न पाठवणारेसुद्धा उत्साहाने चिठ्ठ्या खरडू लागले. चॅटिंगबरोबर त्यासाठी वेगळी भाषाच तयार झाली. यात व्याकरणाचे सारे नियम धाब्यावर बसवून शब्दांमधील अक्षरेसुद्धा गाळून फक्त आद्याक्षरांचा उपयोग होतो. कुठे अक्षरांऐवजी अंक वापरले जातात आणि विरामचिन्हांचा भरपूर वापर होतो. आधी विरामचिन्हांमधून राग, प्रेम, हंसू वगैरे सूचित केले जाई, आतां हंसरे, रडके, रुसलेले, खदखदणारे चेहेरेसुद्धा दाखवले जातात. या सर्वांबरोबर शुभेच्छापत्रांची एक लाटच आली आहे. चित्रमय कार्डांपासून त्याची सुरुवात झाली. नंतर ती चित्रे हलू लागली व बोलूसुद्धा लागली. शब्द, चित्रे आणि स्वर यंच्या मिश्रणातून अफलातून संदेश पाठवले जातात. त्यातसुद्धा मुलांसाठी, मित्रमैत्रिणीसाठी, आईवडिलांसाठी, शिक्षकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे शुभसंदेश त्यांच्या जन्मतारखेला पाठवले जाऊ लागले आहेत. माझ्याकडील एका संदेशात तर मुलाने आईला व सुनेने सासूला एकत्र शुभचिंतन केले आहे.

. .  . . . . . . . . . (क्रमशः)

 —–> पुढील भाग ५

One Response

यावर आपले मत नोंदवा