वॉशिंग्टन डीसी मधली अनेक स्मारके पाहतांना अमेरिकेच्या स्वातंत्र्यसंग्रामापासून ते व्हिएटनाममधल्या लढाईपर्यंतच्या इतिहासाची झटपट उजळणी झाली. त्या वास्तूंच्या आजूबाजूला पसरलेली रम्य हिरवळ, फुलांचे ताटवे आणि निर्मळ पाण्याने तुडुंब भरलेले तलाव पाहतांना मन मोहून गेले आणि राइट बंधूंनी हवेत केलेल्या पहिल्या उड्डाणापासून ते मंगळ, गुरू आणि शनी या ग्रहांच्या दूरवरच्या यात्रेला निघालेल्या व्हॉयोजरच्या अंतरिक्षातल्या मोहिमेपर्यंत साध्य केलेल्या गगनभरारीचे सम्यक दर्शन घेतांना मन उचंबळून आले. हा सगळा अनुभव गाठीला मारून आम्ही परतीच्या प्रवासासाठी बसमध्ये येऊन बसलो. या सहलीला निघण्यापूर्वी जी स्थळे पहायला मिळण्याची अपेक्षा होती ती सगळी पाहून झाली होती. आता परत घरी जायचे वेध लागले होते. आपला पुढचा आणि अखेरचा स्टॉप आता फिलाडेल्फियाला असणार असल्याचे टूर गाईडने सांगितले, पण त्यावर कोणीच टाळ्या वाजवून उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली नाही. अमेरिकेतली जी कांही सात आठ शहरे मला ठाऊक होती त्यातलेच फिलाडेल्फिया हे एक असले तरी ते नांव मी कोणत्या संदर्भात वाचले किंवा ऐकले होते ते आठवत नव्हते. डायवरदादाला थोडा आराम मिळावा आणि पर्यटकांनाही चहा कॉफी घेऊन थोडी तरतरी आणता यावी आणि पाय मोकळे करायला मिळावेत एवढ्याचसाठी हा थांबा असावा अशी मी समजूत करून घेतली.
दिवसभर पायपीट करून शरीराला किंचित थकवा आला होता. त्यानंतर या ट्रिपमधले अखेरचे जेवण खातांना बिनधास्त होऊन त्यावर जरा जास्तच आडवा हात मारला गेला होता. त्यामुळे बहुतेक प्रवासी सुस्तावून पेंगुळले होते. बस हलायला लागताच सारे डुलक्या घेऊ लागले. अधून मधून जाग आल्यावर बाहेर शहरातल्या वातावरणाऐवजी कुठे कंट्रीसाइड तर कुठे नागरी वस्त्या दिसत असल्याचे जाणवत होते. खेड्यातल्या जुन्यापुराण्या चर्चेसचे खांब, कमानी व चौकोनी उंच शिखरे आणि आता लहान गांवातसुध्दा दिसणारे शीशमहलासारखे कांचबंद मॉल्स दुरून पाहण्यात फारसे नाविन्य उरले नव्हते. असेच कांही वेळ पुढे गेल्यानंतर एका मोठ्या शहराची स्कायलाइन दिसायला लागली. त्याला बाजूला टाकून बायपासने न जाता आमची बस त्या शहरात शिरली आणि एका जुनाट पण छान दिसणाच्या इमारतीसमोर असलेल्या मोकळ्या जागेत जाऊन थांबली. आम्ही पेन्सिल्व्हानिया राज्यातल्या फिलाडेल्फियाला येऊन पोचलो असल्याचे जाहीर केले गेले. रस्ता ओलांडून पलीकडे असलेल्या इमारतीमधली लिबर्टी बेल जवळून आणि जवळच असलेला इंडिपेन्डन्स हॉल मात्र बाहेरूनच पाहून सर्वांनी तासाभरात परत यायचे आहे अशी सूचना झाली. दोन तीनशे वर्षांपूर्वी बनवलेली, त्यानंतर भंग पावलेली आणि आवाज न करणारी एक घंटा कोणी जिवापाड जतन करून ठेवली असेल याची मला पुसटशी कल्पनाही नव्हती आणि ती पहायला आपण सातासमुद्रापलीकडे जाऊ असे स्वप्नातसुध्दा वाटले नव्हते. त्यामुळे लिबर्टी बेल हे नांव ऐकून त्यातून मला तेंव्हा कांहीच बोध झाला नाही. अशा प्रकारच्या सहलीत मार्गदर्शकाच्या सोबत घोळक्यात राहणे फायदेशीर असते म्हणून कांहीशा अनिच्छेनेच उठून आम्ही त्याच्या मागोमाग चालत गेलो.
लिबर्टी बेल सेंटरमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन्ही बाजूच्या भिंतींवर अनेक सचित्र फलक लावलेले पहायला मिळाले. या ऐतिहासिक घंटेची कुळकथा आणि गेल्या अडीचशे वर्षांचा इतिहास सांगणारी खूप माहिती त्यात दिली होती पण त्यातले एकेक पॅनेल वाचण्याइतका वेळ आमच्याकडे नव्हता. त्यांचे मथळे वाचून आणि चित्रे पाहून साधारण कल्पना आली. सन १७५१ साली फिलीच्या (फिलाडेल्फियाचे संक्षिप्त नांव) स्टेट हाउसच्या इमारतीवर बसवण्यासाठी ही घंटा मागवली गेली. इंग्लंडमधल्या एका फाउंड्रीमध्ये तयार होऊन ती अमेरिकेत आली. पुढे ती भंग पावली, तिची दुरुस्ती करण्यात आली होती, पण ती पुन्हा जास्तच भंगली आणि वाजेनाशी झाली. तिच्या जागी तिच्याच आकाराची दुसरी घंटा टांगण्यात आली आणि ही मूळची ऐतिहासिक घंटा फक्त प्रदर्शनार्थ वस्तू बनली. तिच्या आधारे अनेक दंतकथा रचल्या गेल्या आणि तिला अमेरिकेच्या जनमानसात एक अभूतपूर्व स्थान प्राप्त झाले. या कथांना कसलाही ऐतिहासिक पुरावा नाहीच, त्यांच्या सत्यतेबद्दल शंका सुध्दा घेतल्या जातात, असे असले तरी बहुतेक लोक त्या ख-या मानतात आणि ही घंटा हे जगातल्या सगळ्या समतावादी विचारसरणीचे एक प्रतीक बनले आहे.
युरोपातील इंग्लंड, हॉलंड, स्वीडन वगैरे विविध देशातल्या लोकांचे अमेरिकेच्या पूर्व किना-यावर आगमन झाले आणि त्यांनी आपापल्या वसाहती स्थापन केल्या. आधी त्यांच्या आपापसात लढाया होत असत. अखेर इंग्लंडने इतर सर्वांवर विजय मिळवून आपली सार्वभौम सत्ता स्थापन केली. त्यानंतर फिलाडेल्फिया शहराची भरभराट होऊन ते ब्रिटीश साम्राज्यातले लंडननंतर दुस-या क्रमांकाचे शहर ठरले. अर्थातच ते अमेरिकेतले सर्वात मोठे आणि महत्वाचे शहर झाले होते. अमेरिकेतल्या या पुढारलेल्या राज्यांचा विकास झाला त्याबरोबर तेथील लोकांच्या मनात स्वातंत्र्याची इच्छा जागृत झाली. स्वातंत्र्यासाठी ब्रिटीश राजवटीबरोबर संघर्ष करून तेरा राज्यांनी ते मिळवले. त्यात पेन्सिल्व्हानिया हे एक प्रमुख राज्य होते. १७७४ साली फिलाडेल्फियाच्या स्टेट हाउसच्या इमारतीवरील ही घंटा वाजवून तिथल्या नागरिकांना एकत्र करण्यात आले आणि त्यांच्या समोर अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा वाचून दाखवण्यात आला. अशा रीतीने संपूर्ण जगाच्या इतिहासाला नवे वळण लावणा-या घटनेची ही घंटा एक साक्षीदार आहे असे समजले जाते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या इमारतीचे नांव बदलून ते इंडिपेन्डन्स हॉल असे ठेवण्यात आले, तसेच या घंटेचे लिबर्टी बेल असे नामकरण करण्यात आले. आज या दोन्ही ठिकाणांना अमेरिकेमधील एका तीर्थस्थानाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
पुढे झालेल्या यादवी युध्दाच्या काळात ही घंटा म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याबरोबरच जनतेच्या व्यक्तीस्वातंत्र्याचीही प्रतीक बनली. उच्चनीच कांही नेणे भगवंत अशी शिकवण आपल्या संतांनी पूर्वापारपासून दिलेली आहे, पण अमेरिकेत वर्णभेदाचे भयानक स्वरूप अस्तित्वात असतांना सर्व माणसे समान आहेत (ऑल मेन आर बॉर्न इक्वल) या विचाराचा पुरस्कार तिथल्या कांही उदारमतवादी थोर विचारवंत राजकीय नेत्यांनी केला आणि त्यासाठी भीषण संघर्ष केला. त्या काळात समतेचे प्रतीक म्हणून या घंटेची निवड केली गेली. त्याला पडलेला तडा हा कदाचित तत्कालीन भेदभावसुध्दा दर्शवीत असेल. या घंटेची देशभर मिरवणूक काढण्यात आली आणि त्या यात्रेतून समतेचा संदेश गांवोगांवी पोचवण्यात आला. हा सगळा इतिहास सोडला तर या घंटेत फारसे प्रेक्षणीय असे कांही दिसणार नाही.
हॉल ऑफ इंडिपेन्डन्सच्या आंत जाऊन तो पाहण्यासाठी आमच्याकडे अवधी नव्हता आणि त्यासाठी लागणारी परवानगीही नव्हती. त्यामुळे ती ऐतिहासिक इमारत बाहेरूनच पाहून अडीचशे वर्षांपूर्वी अमेरिकेची संसद तिथे कशी भरत असेल याची कल्पना करून घेतली. त्या इमारतीच्या माथ्यावर बसवलेल्या लिबर्टी बेलच्या प्रतिकृतीचे दर्शन घेतले आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.
. . . . . . . . . . (क्रमशः)
Filed under: अमेरिका, प्रवासवर्णन |
प्रतिक्रिया व्यक्त करा