नवलरात्री

विजयादशमी

परंपरागत शास्त्रांमध्ये १.श्रृंगार, २.हास्य, ३.करुण, ४.रौद्र, ५.वीर, ६.भयानक, ७.बीभत्स, ८.अद्भुत, आणि ९.शांत असे नऊ प्रमुख रस सांगितले गेले आहेत. नवरात्री नावाच्या एका जुन्या तामिळ चित्रपटात यातील एकेका रसाचे प्रामुख्याने दर्शन घडवणारी एक घटना रोज घडत जाते, अशा घटनांची साखळी दाखवली आहे. (बहुधा) शिवाजी गणेशन या नटश्रेष्ठाने नऊ सर्वस्वी भिन्न अशा भूमिकांमधून ही रसनिष्पत्ती अप्रतिमरीत्या साधली आहे. पुढे या सिनेमाचे हिंदीकरण करण्यात आले. नया दिन नयी रात नावाच्या या चित्रपटात हरहुन्नरी आणि गुणी नट संजीवकुमार यानेसुध्दा जवळ जवळ त्याच नऊ निरनिराळ्या भूमिका छान वठवल्या आहेत. धोपटमार्गाने जाणाऱ्या माझ्यासारख्याच्या जीवनात असे लागोपाठ नऊ दिवस एवढे नाट्य घडणे शक्य नाही. पण दरवर्षी येणारे नवरात्र एक अनपेक्षित आणि वेगळा अनुभव देऊन जाते असे मात्र योगायोगाने काही वर्षे घडत आले. त्यातल्या कांही वेगळ्या आठवणी मी या लेखात सांगणार आहे.

नव(ल)रात्री – भाग १

इसवी सन २०१० या वर्षातल्या नवरात्रात आम्ही दहाबारा दिवस बाहेरगावी जाऊन फिरून येण्याचा कार्यक्रम तीन महिन्यापूर्वीच ठरवला होता आणि आयत्या वेळी मिळणार नाहीत म्हणून जाण्यायेण्याची तिकीटेही काढून ठेवली होती. त्या आठवडाभरात काय काय मौजमजा करायची याचे थोडे नियोजन करून मनातल्या मनात मांडे खाणे चालले होते. पण ते तसेच हवेत विरून गेले. घटस्थापनेच्या दोनच दिवस आधी पहाटे अचानक आम्हा दोघांनाही अस्वस्थ वाटायला लागले म्हणून शेजारच्या मुलाने दवाखान्यात नेऊन पोचवले. तिथे मला आणि पत्नीला वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये अॅड्मिट करून घेतले.

पहिल्या दिवशी तर आजार आणि त्यावरील औषधोपचार यांच्या संयुक्त प्रभावाने आलेल्या ग्लानीत मी आपल्या खाटेवर निपचित पडून होतो. दुसऱ्या बिछान्यावरला रुग्ण बरा दिसत होता. सकाळपासून तो कोणाची तरी वाट पहात होता. दुपारच्या सुमाराला चाळिशीला आलेल्या त्याच्या दोन मुली आणि तिशीमधली भाची की पुतणी (नीस) अशा तीघीजणी मिळून आल्या. बराच वेळ त्या रुग्णाशी बोलत बसल्या. सगळी तयारी झाल्यानंतर त्याला व्हीलचेअरमध्ये बसवून बाहेर घेऊन गेल्या. संध्याकाळ उलटून गेल्यानंतरच तो आपल्या बेडवर परत आला. मेंदूचे स्कॅनिंग करण्यासाठी त्याला नेले होते असे त्याच्याकडून समजले.

त्या तीन्ही मुली एकमेकींशी आणि त्याला उद्देशूनसुध्दा फर्मास इंग्रजीत बोलत होत्या. अधून मधून एक दोन वाक्ये तो इंग्रजीतच पण ज्या टोनमध्ये बोलला त्यावरून तो कारवारी किरिस्तांव असावा अशी अटकळ मी बांधली होती. हॉस्पिटलमध्ये परत आल्यानंतर त्याने पत्नीला फोन लावून “माका तुका” केले तेंव्हा माझा अंदाज खरा ठरला. इंग्लिश, हिंदी आणि मराठी या तीन भाषांमध्ये मी त्याच्याशी बोलू शकत होतो, पण यातल्या कोणत्याही भाषेत त्याने सांगितलेल्या गोष्टी मला समजत तरी नव्हत्या किंवा माझा त्यांचेवर विश्वास तरी बसत नव्हता. त्यामुळे फारसा संवाद साधता आला नाही. एक अजब व्यक्ती भेटली एवढीच त्याची मनात नोंद झाली. त्याला व्हीलचेअरमधून नेले आणले असले तरी तसा तो बरा दिसत होता आणि त्याच्यावर कसलेच उपचार चाललेले दिसत नव्हते. बहुधा तपासण्या करवून घेण्यासाठी त्याला अॅड्मिट केले असावे. त्या झाल्यावर आणि त्यावरून त्याच्या आजाराचे निदान झाल्यावर त्याला घरी पाठवले.

या व्यक्तीच्या जागेवर आलेला माणूस मात्र वल्ली निघाला. जेवढा वेळ तो जागा असेल, तेवढा वेळ त्याच्या तोंडाची टकळी चाललेली असायची. त्यातून तो केंव्हा केंव्हा मला काहीतरी सांगायचा आणि केंव्हा केंव्हा स्वतःशीच पुटपुटायचा. दोन तीन वेळा नर्सने येऊन त्याला चुप रहायला सांगितले, पण बोलणे बंद झाले की तो कण्हायला लागायचा. त्याच्या विव्हळण्यापेक्षा बोलणे कानाला जरा बरे वाटायचे. निदान ते एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडता येत असे. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगायला त्यालाही काही वाटत नव्हते. त्यामुळे न ऐकलेले वाक्य काही वेळानंतर पुन्हा कानावर पडत असे आणि वाटले तर त्या वेळी ते समजून घेता येत असे. या वल्लीवर एक स्वतंत्र लेख लिहिता येईल इतका त्याच्याबद्दलचा मालमसाला मला त्याच्याकडूनच समजला.

हॉस्पिटलमध्ये मला काही काम करण्याचा प्रश्नच नव्हता. आयव्हीला जोडलेल्या नळीने मी कॉटशी जखडलेला गेलो होतो. गरजेनुसार नर्सने ती तात्पुरती सोडून मोकळीक दिली तरच मी आजूबाजूला थोडा फिरू शकत होतो. त्यामुळे वेगळ्या वॉर्डमध्ये असलेल्या पत्नीकडे जाऊन पाहणेसुध्दा मला शक्य नव्हते. सुदैवाने दोघांनीही आपापले मोबाईल सोबत नेले असल्यामुळे त्यावरून थोडा संवाद करता येत होता. उरलेला वेळ काय करायचे हा एक प्रश्न होता. ब्लॉगवर मी ज्या प्रकारचे लेखन नेहमी करत असतो, त्यासाठी मला काही संदर्भ पहावे लागतात, थोडे उत्खनन करावे लागते. हॉस्पिटलमध्ये त्याची सोय नव्हती. त्यामुळे पूर्णपणे काल्पनिक असे काय रचता येईल याचा विचार करता करता मनात एक कल्पना सुचली. त्यावर काम करतांना मजा वाटू लागली.

हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायच्या आधी टीव्हीवरील एक मालिका मी अधून मधून पहात असे. त्यातली केंद्रीय कल्पना, कथासूत्र आणि पात्रे ओळखीची झाली होती. शेवटचा जो भाग मी पाहिला होता त्यानंतर त्यात काय होणार आहे हे मला माहीत नव्हते. पण यापुढे ही मालिका जास्त ताणून धरण्यापेक्षा तिला आता संपवून टाकण्याची वेळ आली आहे असे माझे मत होते. लेखकाच्या जागी मी असलो तर ती कशा रीतीने संपवता येईल आणि त्याआधी तिचे अस्ताव्यस्त पसरलेले धागे कसे जुळवून आणता येतील याचा विचार करून मी त्यानुसार काही नाट्यमय घटना रचल्या आणि मनातल्या मनात संवाद रचायला लागलो. त्यात एक सूत्रबध्दता असल्यामुळे ते माझ्या लक्षात राहतील असे वाटले. घरी परतल्यानंतर ते टंकून सहा भागात ब्लॉगवर चढवले देखील.

चार दिवसात माझ्या प्रकृतीला आराम पडला. आयव्हीमधून (शिरेतून) औषध देण्याची गरज उरली नाही, तसेच कोणी सेवाशुश्रुषा करण्याची जरूरी उरली नाही. सगळ्या तपासण्या होऊन त्यांचे रिपोर्ट आले होते. आता हॉस्पिटलात राहण्याची आवश्यकता उरली नसल्यामुळे घरी पाठवण्यात आले. पण घर म्हणजे चार भिंतीच होत्या कारण पत्नीचा हॉस्पिटलमधला मुक्काम लांबला होता. संपर्कासाठी टेलीफोन, मनोरंजनासाठी टेलीव्हिजन आणि बहुउपयोगी संगणक हे साथीदार साथीला होते. तसे शेजारी येऊन चौकशी करून गेले. त्यातल्या एकाने नाश्त्यासाठी आणि दुसऱ्याने जेवणासाठी आग्रह केला. नात्यातला एक मुलगा ऑफीस सुटल्यानंतर झोपायला आला. अशा रीतीने मी तसा माणसात होतो. पण अजून खडखडीत बरा झालो नसल्यामुळे नेहमीचे रूटीन सुरू करू शकत नव्हतो. तान्ह्या मुलाप्रमाणे आलटून पालटून थोडा वेळ झोपणे आणि थोडा वेळ जागणे चालले होते. वेळ घालवण्याची साधने हाताशी होतीच.

आमचे नेहमीचे हॉस्पिटल घरापासून दहा किलोमीटर दूर आहे. अद्याप पत्नी तिथे होती. दोन तीन दिवसांनंतर काही वेगळ्या तपासण्या करण्यासाठी तिला चाळीस किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. माझ्या अंगात पुरेसे त्राण आले नसतांनासुध्दा उसने अवसान आणून तिला भेटायला आणि तिची प्रगती पहाण्यासाठी जावे लागत होतेच, पण स्वतःला थकवा येऊ नये यासाठी विशेष काळजी घेणेही आवश्यक होते. जराशी तारेवरची कसरत होत होती. पहिल्या दिवशी मलाच आत्मविश्वास वाटत नसल्यामुळे एका शेजाऱ्याला सोबत नेले. दुसऱ्या दिवशी मला गरज वाटत नव्हती तरी पत्नीच्या आग्रहावरून त्याला आणले. त्यानंतर वेगळ्या आप्तांना ही ड्यूटी लावून दिली.

आजूबाजूला नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात चाललेला दिसत होता. रस्त्यात जागोजागी मांडव घातलेले होते, त्यावर रंगीबेरंगी सजावट केली होती. संध्याकाळी परततांना उशीर झाला तर विजेची आकर्षक रोषणाई दिसत होती. आतापर्यंत बहुतेक दरवर्षी मी सुध्दा त्या उत्सवात हौसेने भाग घेत आलो होतो. यंदा पहिल्यांदाच या गोष्टी अलिप्तपणे पहात होतो. त्यामुळे वाहतुकीला होत असलेल्या अडथळ्याबद्दल तक्रार करत होतो. या वर्षी मराठी, गुजराथी, बंगाली, उत्तर भारतीय यांतल्या कुठल्याच नवरात्राच्या मांडवात जाऊन दर्शनसुध्दा घेतले नाही.

अशा प्रकारे नवरात्र संपूनही गेले. दसऱ्याच्या दिवशी पत्नीला डिस्चार्ज मिळाला. त्या दिवशी तिला पहायला हॉस्पिटलात जाण्याची मला गरज नव्हती. विजयादशमीला सीमोल्लंघन करून गावाच्या वेशीच्या बाहेर जाण्याचा रिवाज आहे. त्या वर्षी मी घराच्या उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाकले नाही. माझ्या पत्नीने उलट दिशेने सीमोल्लंघन करून गृहप्रवेश केला. असे हे त्या वर्षीचे एक वेगळे नवरात्र.
———————————–

नव(ल)रात्री – भाग २

नव(ल)रात्री १

त्या वर्षीच्या नवरात्रात ज्या आप्तांच्याकडे जाण्याचा आमचा बेत होता त्यांचे पूर्वज पेशवाईच्या काळात मराठा साम्राज्याचे सरदार होते. बाळाजी विश्वनाथांप्रमाणे ते कोकणातून पुण्याला आले होते आणि शिंदे होळकरांच्या सैन्यासोबत दिग्विजयासाठी उत्तर हिंदुस्थानात गेले होते. तिकडल्या मोहिमांमध्ये त्यांनी गाजवलेल्या पराक्रमाच्या मोबदल्यात त्यांना त्या भागात (सध्याच्या मध्यप्रदेशात) काही जहागिरी, वतने वगैरे मिळाली होती. पुढे शिंदे, होळकर, पवार, गायकवाड आदि मोठ्या मराठा सरदारांनी ब्रिटीशांबरोबर तह केले आणि ते सारे ब्रिटीशांचे मांडलीक राजे किंवा बडे संस्थानिक झाले. त्यांच्या दरबारातल्या दुसऱ्या फळीमधल्या सरदार मंडळींना त्यांच्याइतका बहुमान मिळाला नव्हता तरी त्यांच्या जहागिरी, वतने, जमीनी, वाडे वगैरे मालमत्ता शाबूत राहिली होती. त्याशिवाय त्यांना ब्रिटीश सरकारकडून सालाना तनखा मिळत असे. तसेच स्थानिक समाजामध्ये ते सरदार या सन्मानपूर्वक उपाधीने (सरदारजी नव्हे) ओळखले जात असत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात सामाजिक समतेचे वारे वाहू लागले आणि अनुपस्थित भूमीधारकांना आपल्या जमीनीवर ताबा ठेवणे कठीण होत गेले. काळाची गरज पाहून या कुटुंबातील लोकांनी इतस्ततः असलेली मालमत्ता विकून टाकली आणि बऱ्हाणपूरचा वाडा, टिमरनी येथील गढी आणि शेतजमीनी यांवर आपले लक्ष केंद्रित केले.

त्यांच्या पूर्वजांच्या काळापासून बऱ्हाणपूरच्या वाड्यात अंबाबाईच्या मूर्तीची उपासना केली जाते. अंबेजोगाई येथील योगेश्वरीमातेचा या मूर्तीमध्ये वास आहे अशी या कुटुंबातील आबालवृध्द सर्वांची नितांत श्रध्दा आहे. घरातील कोणत्याही महत्वाच्या कार्याला आरंभ करण्यापूर्वी तिचा आशीर्वाद घेतला जातो तसेच कार्यसिध्दी झाल्यावर तिचे दर्शन घेऊन कृतज्ञता व्यक्त केली जाते. शिक्षण, नोकरी, व्यवसाय या कारणासाठी बाहेरगावी गेलेली मंडळीसुध्दा हा प्रघात पाळत आली आहेत. तसेच लग्न करून सासरी नांदत असलेल्या माहेरवाशिणीसुध्दा काही प्रमाणात तो पाळतात. हे सारे अत्यंत भक्तीभावाने होत असल्यामुळे देवीच्या सभोवताली असलेले वातावरण पूर्णपणे मंगलमय वाटते. त्यात दांभिकतेचा किंवा व्यापारीकरणाचा अंशसुध्दा आलेला नाही.

त्यांच्या बऱ्हाणपूरच्या वाड्यात योगेश्वरी देवीसाठी प्रशस्त असे देवघर बांधलेले होते. त्याशिवाय नवरात्राच्या उत्सवासाठी एक मोठा दिवाणखाना होता. सुरेख नक्षीकाम केलेले खांब आणि कमानी, कडीपाटाच्या छपराला टांगलेल्या हंड्या झुंबरे यांनी तो छान सजवलेला होता. घटस्थापनेच्या दिवशी देवीच्या मूर्तीची स्थापना या दिवाणखान्यात केली जात असे आणि त्यानंतर दसऱ्यापर्यंत तिचा उत्सव तिथे चालत असे. रोज पहाटेच्या वेळी देवीला जाग आणण्यासाठी ताशा सनई नगाऱ्याचा मंगल नाद करण्यापासून त्याची सुरुवात होत असे. त्यानंतर स्नान करून शुचिर्भूत झाल्यावर देवीची साग्रसंगीत शोडषोपचार पूजा केली जात असे. हा विधी चांगला दोन अडीच तास चालायचा. देवीला शोडष पक्वांन्नांचा नैवेद्य दाखवला जाई. त्यानंतर जेवणावळी सुरू होत आणि दुपार टळून जाईपर्यंत त्या चालत असत. नवरात्रीच्या उत्सवासाठी कुटुंबातील एकूण एक लोक आणि अनेक जवळचे आप्त या वेळी तिथे आवर्जून येत असत. त्यामुळे घराला एकाद्या लग्नघराचे स्वरूप येत असे.

नवलरात्री २

कालांतराने या कुटुंबाच्या बऱ्हाणपूरच्या शाखेतल्या पुढील पिढीमधील मुलांनी बऱ्हाणपूरहून पुण्याला स्थलांतर केले. त्यानंतर देवीची पूजाअर्चा करायला तिथे कोणीच उरले नाही. तेंव्हा सर्वानुमते अंबाबाईच्या मूर्तीला बऱ्हाणपूरहून टिमरनीला नेण्यात आले. तिथल्या वाड्यामधल्या बैठकीच्या खोलीचे रूपांतर देवघरात करण्यात येऊन देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना त्या देवघरात केली गेली. तेंव्हापासून नवरात्रीचा उत्सव टिमरनीच्या वाड्यात साजरा केला जाऊ लागला. पूर्वीपासून परंपरागत पध्दतीने चालत आलेला हा उत्सव अजूनही जवळजवळ तशाच रूपात साजरा केला जात आहे. रोज सकाळी मंत्रोच्चारांसह साग्रसंगीत पूजा, त्यानंतर सुग्रास अन्नाचा नैवेद्य, जेवणाच्या लांबलचक पंगती, जेवतांना सर्वांनी पाळीपाळीने श्लोक म्हणणे, संध्याकाळ झाल्यानंतर घरातल्या सर्वांनी देवीसमोर बसून तिची अनेकविध स्तोत्रे म्हणणे, बराच वेळ चालणारी आरती, रात्रीची जेवणे झाल्यानंतर पुन्हा भजनांच्या गायनाने संगीतसेवा वगैरेमुळे दहा दिवस घर देवीमय झालेले असते आणि एक प्रकारच्या चैतन्याने भारलेले असते. अष्टमीच्या रात्री शिजवलेल्या भाताच्या उकडीपासून महालक्ष्मीची प्रतिमा तयार करून तिची वेगळी पूजा केली जाते आणि घागर फुंकण्याचा विधी केला जातो.

पूर्वीच्या काळात रूढ असलेल्या सोवळेओवळे वगैरेच्या चालीरीती आता कालबाह्य झाल्या असल्यामुळे सामान्यपणे विस्मृतीत गेल्या आहेत. शहरात वाढलेल्या मुलांना त्यांचा गंधही नसतो. पण अजूनही नवरात्राच्या काळात मात्र या घरात त्या कटाक्षाने पाळल्या जातात. पूजाअर्चा करण्यासाठी देवघरात प्रवेश करणाऱ्या पुरुषांसाठी रेशमाचा कद आणि महिलांसाठी नऊवारी लुगडे, लहान मुलींसाठी परकर पोलके हा ड्रेसकोड अजूनही शक्यतोंवर पाळला जातो. नव्या पिढीतली मुले मुली त्यात जास्तच हौसेने सहभागी होतात. सकाळी उठून लवकर स्नान करणे वगैरे मात्र त्यांना समजावून सांगावे लागते.

यापूर्वीही काही वेळा मी या उत्सवात सहभागी झालो होतो. पाटरांगोळी केलेल्या भोजनाच्या पंगतीमध्ये केळीच्या पानात आग्रह करकरून वाढलेले मनसोक्त सुग्रास जेवण केले होते, जेवण चालू असतांना इतरांबरोबर नवा संस्कृत श्लोक (मुद्दाम पाठ करून) मोठ्याने म्हंटला होता. स्तोत्रपठण, आरत्या, मंत्रपुष्प, भजन आदींमध्ये आठवेल तेवढा आणि जमेल तेवढा सहभाग उत्साहाने घेतला होता. या सर्वांमध्ये मिळणारा वेगळ्या प्रकारचा आनंद उपभोगला होता. नोकरीत असतांना जास्त रजा मिळणे शक्य नसल्यामुळे नवरात्रोत्सवातल्या एक दोन दिवसाकरताच भोज्ज्याला शिवून आल्याप्रमाणे जाणे होत होते. त्या वर्षी चांगला आठवडाभराचा कार्यक्रम योजला होता, पण योग नव्हता. त्यानंतर आम्ही एकदा ते जुळवून आणले आणि अंबामातेच्या कृपेने ते शक्य झाले.
—————————–

नव(ल)रात्री – भाग ३

newJercyCombo

त्याच्या दोन वर्षे आधी म्हणजे २००८ साली सर्वपित्री अमावास्येच्या रात्री आम्ही दोघांनी मुंबईहून विमानाने प्रस्थान केले आणि घटस्थापनेच्या दिवशी सकाळी नेवार्क विमानतळावर उतरून अमेरिकेच्या भूमीवर पहिले पाऊल ठेवले. आमच्या दृष्टीने एका अर्थाने हे सीमोल्लंघनच होते. नवरात्र संपून दसऱ्याच्या मुहूर्तावर करण्याऐवजी आम्ही ते नवरात्राच्या सुरुवातीलाच केले होते. आमचे दुसरे पाऊल अजून अधांतरीच होते. अमेरिकेच्या इमिग्रेशन ऑफीसरने परवानगी दिल्यानंतर आम्हाला अमेरिकेत प्रवेश मिळणार होता. काँटिनेंटल विमान कंपनीच आम्हाला पुढे अॅटलांटाला नेणार होती, पण आमचे सामानसुमान आधीपासूनच पुढे पाठवण्यात अर्थ नव्हता. आम्ही नेवार्कलाच ते उतरवून घ्यावे आणि इमिग्रेशन क्लीअरन्स मिळाल्यानंतर पुन्हा कंपनीकडे सुपूर्द करावे अशी आज्ञा झाली. इतर प्रवाशांबरोबर आम्ही बॅगेज क्लीअरन्सच्या विभागात जाऊन पोचलो.

भारतातल्या आणि युरोपातल्या विमानतळांवर मी जे बॅगेजचे कन्व्हेयर बेल्ट पाहिले होते त्यांचे एक शेपूट बाहेर गेलेले असायचे आणि त्यावर व्यवस्थित मांडून ठेवल्याप्रमाणे आमचे सामान आत येतांना दिसायचे. नेवार्कला मात्र वेगळेच दृष्य पहायला मिळाले. एका विशाल हॉलमध्ये अनेक लहान लहान वर्तुळाकार बेल्ट गोल गोल फिरत होते. कोणत्या विमानातले बॅगेज कोणत्या बेल्टवर येणार हे दाखवणारे मोठे तक्ते होते. त्यात आमचा नंबर पाहून त्या वर्तुळापाशी गेलो. त्याच्या मधोमध एक घसरगुंडी होती आणि डोक्यावर असलेल्या फॉल्स सीलिंगच्या आडून सामान येऊन छपरामध्ये असलेल्या एका पोकळीतून बदाबदा त्या घसरगुंडीवर पडून ते बेल्टवर येत होते. त्यात अनेक बॅगा उलटसुलट होत होत्या. आपले सामान दुरूनच पटकन ओळखू येण्यासाठी आम्ही बॅगांच्या वरच्या अंगाला मोठमोठी लेबले चिकटवली होती, पण ती काही दिसत नव्हती. काही लोकांना आपल्या बॅगा अचूक ओळखता येत होत्या, त्यांनी त्या पटकन काढून घेतल्या. इतर लोक अंदाजाने एक बॅग उचलून घेत होते आणि ती त्यांची नसल्यास तिला सुलट करून पुन्हा बेल्टवर ठेवत होते. या सस्पेन्समध्ये थोडा वेळ घालवल्यानंतर आम्हाला आमचे सर्व सामान मिळाले. ते नसते मिळाले तर काय करायचे हा एक प्रश्नच होता, कारण आम्हाला तर लगेच पुढे अॅटलांटाला जायचे होते, बॅगांची वाट पहात नेवार्कला थांबायची कसली सोयच नव्हती. विमानातून आपले सामान न येण्याचा अनुभव आम्ही लीड्सला जातांना घेतला होता, पण त्यावेळी आम्ही सामानाविनाच निदान घरी जाऊन पोचलो होतो. त्यावेळी अर्ध्या वाटेत थांबायची गरज पडली नव्हती.

आमचे सामान गोळा करून आम्ही इमिग्रेशन काउंटरकडे गेलो. त्या ठिकाणी बरीच मोठी रांग होती, तिच्यात जाऊन उभे राहिलो. आमचे पासपोर्ट आणि व्हिसा आम्ही स्वतः फॉर्म भरून, तासन् तास रांगांमध्ये उभे राहून आणि आवश्यक असलेली सारी कागदपत्रे दाखवून मिळवले होते आणि पुन्हा पुन्हा त्यातला तपशील तपासून घेतला होता. त्यामुळे त्यात कसलीही उणीव निघण्याची भीती नव्हती. गरज पडली तर दाखवण्यासाठी ते सारे दस्तावेज आम्ही आपल्या हँडबॅगेत ठेवले होते. आम्ही केंद्र सरकारपासून महापालिकेपर्यंत सर्वांना देणे असलेले सर्व कर वेळेवर भरले होते, आमचे वाईट चिंतणारा कोणी आमच्याविरुध्द कागाळी करेल अशी शक्यता नव्हती. त्यामुळे आम्हाला चिंता करण्याचे कारण नव्हते, पण एक दोन ऐकीव गोष्टींमुळे मनात थोडीशी धाकधूक वाटत होती.

माझ्या एका मित्राच्या अमेरिकेत राहणाऱ्या मुलीकडे गोड बोतमी होती. या प्रसंगी तिला धीर देण्यासाठी, तिची आणि होणाऱ्या बाळाची नीट काळजी घेण्यासाठी तिच्याकडे जायला तिची आई आतुर झाली होती. पहिल्या बाळंतपणासाठी मुलीने माहेरी जायचे अशी आपल्याकडली पूर्वापारची पध्दत आहे. आजकालच्या जगात काही कारणामुळे ते शक्य नसेल तर मुलीच्या आईने काही दिवस तिच्याकडे जाऊन राहणेही आता रूढ झाले आहे. आपल्या मुलीकडे अमेरिकेत जाण्यासाठी केवळ पुरेसेच नाही तर चांगले भरभक्कम कारण आपल्याकडे आहे अशी त्या माउलीची समजूत होती, पण तिला परवानगी मिळाली नाही. दुसरे एक गृहस्थ मुंबईतल्या धकाधुकीमुळे हैराण झाले होते. त्यांची म्हातारपणाची काठी, त्यांचा मुलगा, अमेरिकेत ऐषोआरामात रहात होता. कांही दिवस त्याच्या आधाराने रहावे, सर्व आधुनिक सुखसोयींनी युक्त असलेल्या त्याच्या निवासस्थानाचा अनुभव आणि उपभोग घ्यावा अशा विचाराने ते अमेरिकेला जायला निघाले. त्यांनाही जाता आले नाही. हे ऐकल्यानंतर आमच्या घरी आम्ही सुखी आहोत, चार दिवस अमेरिकेतली नवलाई पाहून परत जाणार आहोत असे आम्ही मुलाखतीत सांगितले होते. तेच पुन्हा सांगायचे होते, फक्त त्यासाठी योग्य शब्दांची जुळवाजुळव करत होतो.

आमचा नंबर ज्या काउंटरवर आला त्या जागी कोणी खडूस तिरसिंगराव माणूसघाणे नव्हता. एका सुहास्यवदना ललनेने गोड हंसून आमचे स्वागत केले. “अमेरिकेत पहिल्यांदाच आला आहात ना?” असे विचारून “जा, मजा करा (एंजॉय युवरसेल्फ)” असे म्हणत एक चिटोरे आमच्या पासपोर्टमध्ये ठेवले आणि ते जपून ठेवायला सांगितले. आम्ही अमेरिकेत किती दिवस राहू शकतो ते त्यावर लिहिले होते आणि त्यापूर्वी अमेरिकेहून परत जातांना विमानतळावर ते परत द्यायचे होते. घटस्थापनेच्या दिवशी अंबाबाईनेच आपल्याला या रूपात दर्शन दिले अशी मनात कल्पना करून आणि तिचे आभार मानत आम्ही पुढे सरकलो.

. . . . . . . . . . . .

नव(ल)रात्री – भाग ४

LibertyCombo

परदेशभ्रमणाचा थोडा अनुभव माझ्या गाठीशी होता. पुढे अॅटलांटाला जाण्यासाठी आम्हाला कोणत्या गेटवर विमान मिळणार आहे हे विमानतळावरील फलकावर पाहून घेतले आणि कॉरीडॉरमधील पाट्या वाचून त्यात दाखवलेल्या खुणांनुसार डाव्या उजव्या बाजूला वळत आणि एस्केलेटर्सने वर खाली चढत उतरत आमचे गेट गाठले. विमान गेटवर लागायला बराच अवकाश होता. मुंबईतल्या ऑक्टोबर हीटमधून थेट अमेरिकेतल्या फॉल सीझनमध्ये आल्याने तपमानात एकदम चांगला पंचवीस तीस अंशांचा फरक पडला होता. त्याने सर्वांग गारठून गेले होते. थंडीचा विचार करून गरम कपड्यांची गाठोडी आणली होती आणि एक एक करून ते कपडे अंगावर चढवलेही होते. तरीही नाकातोंडामधून आत जाणारी थंड हवा तिचा हिसका दाखवत होती. त्यावर इलाज म्हणून गरम गरम चहा घेतला. आधी थोडी चंव घेऊन पहावी या विचाराने घेतलेला तिथला स्मॉल पेला, आमच्या नेहमीच्या कपाच्या दुप्पट आकाराचा होता. तो घशात रिचवल्यानंतर अंगात पुरेशी ऊब आली. ठरल्यावेळी आमचे विमान आले आणि त्यात बसून आम्ही अॅटलांटाला जाऊन पोचलो.

हे विमान आकाराने लहानसे होते आणि अॅटलांटाला थोडा वेळ थांबून पुढे जाणार होते, तरीही ते अर्धवटच भरले होते. त्यातलेही अर्ध्याहून अधिक उतारू अॅटलांटाला न उतरता पुढे चालले गेले. आमच्यासोबत जेमतेम वीस पंचवीस लोक तिथे उतरले असतील. तिकडे विमानतळावर अनेक प्रकारची दुकाने असलेला बाजारच असतो आणि अनेक लोक त्यातून नेहमीच फिरत असतात. आम्हीसुद्धा स्टॉलवरून काही खरेदी करण्यासाठी एका जागी दोन तीन मिनिटे थांबलो तेवढ्यात आमच्याबरोबर उतरलेले इतर लोक इकडे तिकडे पांगले आणि कुठे अदृष्य झाले ते आम्हाला कळलेही नाही. आमचे सामान घेण्यासाठी बॅगेजची पाटी वाचून त्यात दाखवलेल्या बाणाच्या दिशेने आम्ही चालत राहिलो. तो एक लांबच लांब कॉरीडॉर होता आणि चालण्याचे कष्ट टाळायचे असल्यास सरकत्या पट्ट्यावर उभे राहून पुढे जायची सोय होती. पाचसहा मिनिटे पुढे जाऊनसुध्दा आमचे ठिकाण येण्याची लक्षणे दिसत नव्हती. कोणाला विचारावे म्हंटले तर आमच्या नजरेच्या टप्प्यात कोणीही दिसत नव्हते. आम्हा दोघांच्या आजूबाजूला, मागेपुढे कोणीही त्या मार्गाने जात नव्हते. हे विचित्र वाटत असले तरी आम्ही कांहीच करू शकत नव्हतो. पुढे पुढे चालत राहिल्यानंतर एक ठिकाण आले. त्या ठिकाणी दुसरे लँडिंग गेट होते. त्या जागी थोडी माणसे नजरेला पडली. “सामान घेऊन विमानतळाबाहेर पडण्यासाठी ट्रेनने जायचे असते.” असे त्यांनी सांगितले. “ट्रेनचे स्टेशन कुठे आहे?” हे विचारल्यावर त्यांनी बोटाने एक जागा दाखवली.

लिफ्टच्या दरवाजासारखे दिसणारे असे काहीतरी तिथे होते आणि त्याच्या समोर चारपाच उतारू सामान घेऊन उभे होते. दोन तीन मिनिटातच आतल्या बाजूने हलकासा खडखडाट ऐकू आला आणि तो दरवाजा उघडला. पलीकडे एक अगदी पिटुकला प्लॅटफॉर्म होता आणि आगगाडीचा एकच डबा उभा होता. पटापट सगळे जण त्यात चढले, दरवाजे बंद झाले आणि त्या डब्याने वेग घेतला. हे लिफ्टमध्ये चढल्यासारखेच वाटत होते, फक्त ती उभ्या रेषेत वरखाली न करता आडव्या रेषेत धांवत होती. अॅटलांटाचा विमानतळ इतका विस्तीर्ण आहे की त्याचे ए, बी, सी, डी वगैरे विभाग आहेत आणि त्या सर्व विभागांना बाहेरून जाण्यायेण्याच्या वाटेशी जोडणारी शटल सर्व्हिस आहे. इथे असे काही असेल याची मी कल्पनाही केली नव्हती. सामान उतरवून घेण्याच्या जागी जाऊन पोचलो तो आम्हाला घेण्यासाठी आलेले अजय आणि किरणराव पट्ट्याजवळच उभे होते आणि आमच्या बॅगाही पट्ट्यावर फिरत होत्या. आपले सामान उतरवून घेतल्यावर त्यांच्याबरोबर गाडीत जाऊन बसलो. कोणता माणूस कोणते सामान घेऊन बाहेर जात आहे याची चौकशी करणारा कोणीच इसम तिथल्या दरवाज्यावर नव्हता.

अॅटलांटाचा विमानतळ शहराच्या दक्षिण टोकाला आहे, तर अजय रहात असलेले अल्फारेटा गाव अॅटलांटाच्या उत्तरेला पंचवीस तीस मैलांवर आहे. आधीचे निदान पंधरावीस मैलतरी आम्ही अॅटलांटा शहराच्या भरवस्तीमधून जात होतो. पण वाटेत एकही चौक लागला नाही की ट्रॅफिक सिग्नल नाही. कुठे जमीनीखालून तर कुठे जमीनीवरून सरळसोट रस्त्यावरून आमची कार सुसाट वेगाने धांवत होती. वाटेत जागोजागी उजव्या बाजूला फाटे फुटले होते. शहरातल्या आपल्या इच्छित स्थळी जाणारे लोक आधीपासून आपली गाडी उजवीकडील लेनमध्ये आणत होते आणि वळण घेऊन हमरस्त्याच्या बाहेर पडत होते. हा हमरस्ता अॅटलांटापासून पन्नास साठ मैल दूर गेल्यानंतर एका राष्ट्रीय महामार्गाला मिळतो. वाटेत लागणाऱ्या उपनगरांना आणि लहान शहरांना जोडणारे अनेक एक्झिट्स होते. नऊ की दहा नंबराच्या एक्झिटमधून आम्ही एक्झिट केले आणि अल्फारेटा शहरातल्या अजयच्या घराकडे गेलो. या गावातल्या रस्त्यांवर मात्र जागोजागी ट्रॅफिक सिग्नल होते आणि रस्त्यात दुसरे वाहन असो वा नसो, लाल दिवा दिसताच लोक आपली गाडी थांबवून तो हिरवा होण्याची वाट पहात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हे नवनवे अनुभव घेत आम्ही घरी जाऊन पोचलो.

जेट लॅगचे निमित्य करून दोन दिवस झोपून काढले आणि चौथ्या दिवशी आम्ही पर्यटनासाठी निघालो. आम्ही उभयता आणि किरणराव व विद्याताई अशा चार लोकांचे नायगराचा धबधबा, वॉशिंग्टन डीसी आणि इतर काही ठिकाणे पहाण्यासाठी तीन दिवसांच्या एका लघुसहलीचे रिझर्वेशन केलेले होते. ती न्यूयॉर्कहून सुरू होऊन तिथेच संपणार होती. आपापल्या गांवांपासून न्यूयॉर्कला जाणेयेणे सर्व पर्यटकांनी आपल्या आपण करायचे होते. आम्ही नेवार्कमार्गे अॅटलांटाला एकदा आल्याने आता आम्ही त्या मार्गावरले तज्ज्ञ झालो होतो. नेहमीची सरावाची वाट असावी अशा आविर्भावात आम्ही अॅटलांटाहून निघालो आणि नेवार्कला सुखरूप जाऊन पोचलो. तो शनिवारचा दिवस असल्याने सौरभला सुटी होती. आम्हाला नेण्यासाठी विमानतळावर तो आला होताच. तिथल्या महामार्गावरून तो आम्हाला पर्सीपेन्नी या त्याच्या गावाला घेऊन गेला. खूप रुंद आणि सरळसोट रस्ते, त्यावरून कुठेही न थांबणारी वाहतुकीची रांग, एक्झिटवरून बाहेर पडणे वगैरे गोष्टी आता ओळखीच्या झाल्या होत्या.

रविवारी आम्ही सगळे मिळून बसने न्यूयॉर्कला गेलो. अर्थातच सर्वात आधी स्वातंत्र्यदेवीच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. “जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे, स्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुताम् वंदे।” हे स्फूर्तीदायक गीत लहानपणापासून म्हणत आलो असलो तरी स्वतंत्रता ही एक मनाला जाणवणारी आणि बुध्दीला आकलन होणारी संकल्पना होती. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला पाहून ती दृष्य स्वरूपात नजरेसमोर आली. स्वातंत्र्यमातेच्या या मूर्तीचा भव्य आकार, तिची मुद्रा, तिच्या चेहेऱ्यावर असलेले भाव या सर्वांमधून तिचे स्वरूप प्रकट होत होते. आदिशक्तीचे हे आगळे रूपसुध्दा मला एका नवरात्रातच पहायला मिळाले.

त्यानंतर तीन दिवस अनेक प्रेक्षणीय स्थळे पाहून दसरा येईपर्यंत आम्ही नेवार्कमार्गे अॅटलांटाला परत आलो. या सफरीबद्दल मी पूर्वीच विस्तारपूर्वक लिहिलेले आहे. रोममध्ये असतांना रोमन व्हा अशा अर्थाचे एक सुभाषित आहे. थोड्या वेगळ्या अर्थाने गंगा गये गंगादास, जमना गये जमनादास असे हिंदीत म्हणतात. आम्ही मात्र अमेरिकेत गेल्यानंतरसुध्दा घरात मराठीच राहिलो होतो, पण चिनी लोकांनी चालवलेल्या अमेरिकन यात्रा कंपनीबरोबर जातांना समझोता करावाच लागला. ज्या हॉटेलांमध्ये आमची झोपायची व्यवस्था झाली होती त्यातल्या खोल्या इतर सुखसोयींनी युक्त असल्या तरी त्यांमध्ये आंघोळीची सोय नसायची. विमानात असते तशा प्रकारचे एक छोटेसे टॉयलेट रूमला जोडलेले असले तरी त्यात टब किंवा शॉवरसाठी जागाच नसायची. पहाटेच्या वेळी तपमान शून्याच्या जवळपास असायचे आणि बदलण्यासाठीसुध्दा अंगावरचे कपडे काढणे जिवावर येत असे. त्यामुळे बाथरूमचे नसणे आमच्या पथ्यावरच पडत असे. त्या वर्षीच्या नवरात्रातले दोन दिवस पारोसेच राहिलो. जेवणासाठी आमची बस एकाद्या केएफसी किंवा मॅकडीच्या रेस्तराँसमोर उभी रहात असे. आपल्याकडे मिळतात तसले उकडलेल्या बटाट्याचे व्हेजी बर्गर तिथे नसायचे. नवरात्र चालले असल्याची जाणीव बाजूला ठेवून नाइलाजाने थोडा मांसाहार करणे भाग पडत होते. गोडबोले की आठवले नावाचे एक तरुण जोडपे आमच्याबरोबर सहलीला आले होते. त्यांनी काजू, बदाम, पिस्ता, बेदाणे वगैरे सुक्या मेव्याची मोठमोठी पुडकी आणि खूप सफरचंदे आणली होती. शिवाय मिळतील तिथे केळी, संत्री, मोसंबी वगैरे ते घेत होते. ते मात्र शुध्द शाकाहारी राहिलेच, कदाचित त्यांना तीन दिवस उपवाससुध्दा घडला असेल. रक्तामधली साखर, कोलेस्टेरॉल वगैरे वाढण्याच्या भीतीने आम्ही तसे करू शकत नव्हतो आणि ते कमी होण्याच्या भीतीने उपाशीही राहू शकत नव्हतो. त्यामुळे जो काही पापसंचय होत होता त्याला इलाज नव्हता. हे नव(ल)रात्र नेहमीपेक्षा खूपच आगळे वेगळे असल्यामुळे कायम लक्षात राहील.
. . . . . . . . .

यावर आपले मत नोंदवा