नृत्य आणि नाच

नृत्य आणि नाच

प्रत्येक माणसाला सूर आणि ताल याची थोडीफार जाण व देणगी निसर्गतःच मिळते. कांही लोकांना त्यांचे वरदान मिळते आणि ते कलाकार त्या वरदानाचा प्रयत्नपूर्वक विकास करून संगीत व नृत्याच्या क्षेत्रात प्राविण्य मिळवतात. इतर लोक सुद्धा कधी ना कधी ओठातल्या ओठात गाण्याची ओळ गुणगुणतांना किंवा बसल्या बसल्या हाताच्या बोटांनी कसलातरी ठेका धरतांना दिसतातच. जन्माला आलेले लहान मूल वर्षभराच्या आंतच कसल्या तरी आधाराला धरून उभे रहायला शिकते त्याच्या पाठोपाठ “एक पाय नाचीव रे गोविंदा, घागरीच्या छंदा” करीत तालावर पाय नाचवू लागते. चालायला लागल्यावर तर ती सतत स्वतः नाचत असतात आणि मोठ्या लोकांना नाचवत असतात.

नाचणे हा जगभरातील सगळ्या समाजांमधील पारंपरिक संस्कृतींचा भाग आहे. काश्मीरपासून केरळपर्यंत आणि कच्छपासून मणिपूरपर्यंत भारतातील प्रत्येक भागातील लोकांची आगळी वेगळी लोकनृत्ये आहेत. मग त्यात कुठे जलदगती असेल तर कुठे संथ लय असेल. भांगडा वा गरबा यासारखे परप्रांतातील लोकप्रिय नाच किंवा आपल्याकडील कोळी किंवा धनगर यांच्या पारंपरिक नाचांमध्ये भाग घेणारे सगळेच लोक उत्साहाने नाचतात. विठ्ठलाच्या नांवाचा गजर करीत उभे राहून भजन करतांना टाळमृदुंगांच्या तालावर भक्तगण तल्लीन होऊन नाचतांना दिसतात. याला ‘नाच’ म्हणणे कदाचित कांही लोकांना आवडणार नाही. पण “वाळवंटी नाचू आम्ही वाळवंटी गाऊ”आणि “दिंड्या पताका वैष्णव नाचती” असे संतांनीच म्हंटले आहे. भारूड हा प्रकार तर नाचत नाचतच गाइला जातो. झिम्मा फुगड्या वगैरे गोष्टी मंगळागौरीला हव्यातच. फेर धरून हदग्याचा नाच पूर्वी रूढ होता. हे सगळे नाचाचे प्रकार आपल्या मनातला उत्साह व्यक्त करून त्यातून स्वतःच आनंद मिळवण्यासाठी उत्फूर्तपणे होतात. त्यासाठी तालिम किंवा शिक्षण घेण्याची आवश्यकता नसते. तसे घेतले तर अधिक चांगल्या प्रकारे करता येईल, पण या लोकांच्या कला आहेत आणि त्यांना त्या एकमेकांचे पहात आपोआप येतात.

तमाशा, नौटंकी, मुजरा, यक्षगान बैलाटा आदि लोककलांचे प्रकार करणाऱ्या कलावंतांनी त्यांना लोकाभिमुख असे व्यावसायिक स्वरूप दिले. ते खेळ खाजगी बैठकींमध्ये आणि सार्वजनिक रंगमंचावर सादर होऊ लागले. त्यांच्या नाचात सर्वसामान्य लोक करीत असलेल्या नाचापेक्षा वेगळ्या हालचाली, वेगळे हावभाव आले. त्यापासून समाजाला रंजवण्याचे काम करणारा एक वर्ग निर्माण झाला. मनोरंजनाची इतर साधने निर्माण होण्यापूर्वीच्या काळात त्यांचा मोठा प्रभाव होता.
इतर कलांप्रमाणेच नृत्यकलेचा विकास होत गेला तेंव्हा त्याची शास्त्रे तयार झाली. ते पाहणारा चोखंदळ रसिक प्रेक्षकवर्ग तयार झाला. दक्षिणेकडे भरतनाट्यम, कथाकली, मोहिनी अट्टम, कुचीपुडी तर उत्तरेला कथ्थक आणि पूर्वेला ओडिसी, मणिपुरी या प्रसिद्ध नृत्यकलांच्या शास्त्रीय शैली विकसित झाल्या. कित्येक लोकांनी जन्मभर साधना करून त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाचे स्थान मिळवून दिले.

ढोबळ मानाने पाहता सर्वसामान्य लोकांचे आनंदाने उत्स्फूर्तपणे ताल धरून नाचणे, कलावंत व कलावतींनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी त्यांच्यासमोर त्यांना आवडेल असे आविर्भाव करीत नाचणे आणि नृत्यकलांचे शास्त्रोक्त कलाविष्कार असे तीन मुख्य प्रकार दिसून येतात.

पौराणिक काळापासून नृत्यकला भारतात प्रचलित आहे. “गणराज रंगी नाचतो” हे गाणे आजच्या काळातले असले तरी आपली तुंदिल तनु एका पायावर तोलून धरीत नृत्य करणाऱ्या गजाननाच्या अनेक प्राचीन प्रतिमा उपलब्ध आहेत. श्रीकृष्णाचे वर्णन “देहुडा चरणी वाजवितो वेणू” असे करतांना त्याची एक मुद्रा दाखवली आहे. कालियामर्दन करतांना तो कालिया नागाच्या मस्तकावर थयथया नाचला होता. शंकराचे ‘नटराज’ हे रूप प्रसिद्ध आहे. संतापाच्या भरात तांडवनृत्य करून त्याने चराचराचा संहार केल्याची कथा आहे. देवराज इंद्राचा दरबार म्हणजे गंधर्वांचे गायन आणि अप्सरांचा नाच हे समीकरण रूढ आहे. तपश्चर्येच्या सामर्थ्याने कोणी ऋषी आपले इंद्रपद हिरावून घेईल या भीतीने त्या ऋषीचे तपोभंग करण्यासाठी तो इंद्र कधी कधी एकाद्या अप्सरेला त्याच्याकडे पाठवून देत असे आणि ती अप्सरा मोहक नृत्य करून त्या तपस्व्याचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत असे. बहुतेक प्राचीन मंदिरांच्या गोपुरांवर किंवा भिंतींवर नृत्याच्या विविध मुद्रामधील मूर्ती चितारून त्यांना शोभिवंत केलेले असते. भक्तीमार्गामध्ये ज्या नवविधा आहेत त्यात आपले देहभान हरपून परमेश्वराचे चरणी लीन होण्याला महत्व आहे. म्हणूनच “नाचत नाचत गावे, ब्रम्हानंदी तल्लीन व्हावे” असे म्हंटलेले आहे. “पग घुंगरू बांध मीरा नाची रे ” म्हणणारी मीराबाई आणि दोन्ही हातात चिपळ्या घेऊन हरिभजनात तल्लीन होऊन नाचणारे चैतन्य महाप्रभू यांच्या अशाच मुद्रा डोळ्यासमोर येतात.

चित्रपटसृष्टीमध्ये नाचाच्या या सर्वच प्रकारांचा भरपूर उपयोग केला जातो. सिनेमा चांगला चालावा, जास्तीत जास्त प्रेक्षकांना त्याकडे आकर्षित करावे यासाठी त्यात नाचगाण्यांची भर घालण्यात आली व अजूनही घालण्यात येते यात शंका नाही. पण कालांतराने चित्रपटांच्या प्रभावामुळे नृत्य व गायन कला अधिक लोकमान्य आणि लोकप्रिय झाल्या असेसुद्धा म्हणावे लागेल. एक जवळचे उदाहरण द्यायचे झाल्यास आपल्या महाराष्ट्रात पूर्वीच्या काळातील लग्नसमारंभात नाचगाणे कुठे होते? नाही म्हणायला दोनच प्रसंगी थोडेसे गायन व्हायचे. लग्नघटीच्या मुहूर्ताच्या वेळी शार्दूलविक्रीडित वृत्तात रचलेली मंगलाष्टके एका विशिष्ट चालीत संथ गतीने म्हंटली जात आणि विहिणीच्या पंक्तीमध्ये “ओटीत घातली मुलगी विहीणबाई, सांभाळ करावा हीच विनवणी पायी।” यासारखी गाणी गाऊन तिला लोणी लावले जाई. आता काळ बदलला आहे. अजूनही मंगलाष्टके असतात, पण त्यात शार्दूलविक्रीडित कमी होऊन केदार आणि कलावती रागातील गीते घुसली आहेत. विहिणीची पंगत बहुतेक ठिकाणी इतिहासजमा झाली आहे. आणि नव्या जमान्यात तिला उगीच कशाला भाव द्यायचा? वाटलेच तर “गळ्यात बांधली मुलगी विहीणबाई, सांभाळून रहा आता तुमची धडगत नाही।” असा इशारा द्यावा. पूर्वीच्या लग्नात नाचाचा प्रकार नव्हताच. आता मात्र सर्रास सगळे नवरदेव बोहल्यावर चढण्यापूर्वी त्यांची आप्तेष्ट व मित्रमंडळी मुक्तपणे नाचण्याचा जल्लोष करीत येतात. अनेक ठिकाणी डी.जे.ला बोलावून जलद ठेक्याची ठसकेदार गाणी ध्वनिक्षेपकावर लावतात, उघडझाप करणारे लखलखते दिवे आणि चमचमते व्यासपीठ बनवलेले असतेच. नवरा नवरी आणि व्याहीविहिणीसह समस्त लोक त्यावर मनमुराद “शाव्वा शाव्वा” करून घेतात. त्यात कांहीसुद्धा गैर नाही. आनंदाच्या प्रसंगी मनातला आनंद दिलखुलासपणे कोणीही व्यक्त करावा. पण तो करण्याच्या पद्धतीमधील हा बदल हिंदी सिनेमामुळे आला आहे असे मला वाटते.

बोलपट सुरू झाल्यापासून त्यात गाणी आली तसेच नाचही आले. वर दिलेल्या प्रकारांशिवाय सिनेमातील गाणी हावभाव करून सादर करणे सुरू झाले. या प्रकारात चेहेऱ्यावरील भावांनाच महत्व असते आणि ते क्लोजअप्समधून व्यवस्थित दाखवले जातात. या प्रकारातल्या नाचण्यात अगदी मोजक्या मुद्रा असतात, त्यापेक्षा धांवाधांवच जास्त असते. त्यामुळे या प्रकाराला नृत्यातून वगळले तरी चालेल. कोळीनृत्य, धनगरनृत्य वगैरे नाच विशिष्ट प्रसंगानुसार टाकतात. दिंडी, भारूड, जोगवा, गोंधळ, वाघ्या मुरळी, वासुदेव वगैरे विविध पारंपरिक आविष्कार ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटातून दिसतात. “धौम्यऋषी सांगतसे रामकथा पांडवा” किंवा “उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर” अशा गाण्यातून अत्यंत सोज्ज्वळ गीतांवरील समूहनृत्ये दाखवली आहेत.

तमाशातील गण, गौळण, सवाल जबाब आणि मुख्यतः लावणी हे मात्र हुकुमाच्या एक्क्यासारखे अनंत चित्रपटांमध्ये वापरले गेले. जुन्या काळातील “लटपट लटपट तुझं चालणं मोठ्या नख-याचं” पासून सिनेमातील लावणी फुलतच गेली. कधी “नेहमीच राया तुमची घाई, नका लावू गठुडं बांधायला” किंवा “फड सांभाळ तुऱ्याला ग आला, तुझ्या उसाला लागंल कोल्हा” यासारखी अस्सल ग्रामीण भाषा तर कधी “पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा” किंवा “तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडुन जाऊ रंगमहाल” अशी अलंकारिक भाषा, कधी “चढाओढीनं चढवीत होते, ग बाई मी पत्तंग उडवीत होते”, “मला लागली कुणाची उचकी” असे वेगळेच विषय घेऊन ती अनंत अंगाने बहरली. लतादीदी आणि आशाताई यांच्यासारख्या प्रख्यात व ज्येष्ठ गायिकांनी त्या गायिल्या. उषाताई व सुलोचना चव्हाण यांनी तर ढंगबाज लावणी गायिका म्हणून आपापले वेगळे स्थान निर्माण केले. लीला गांधी, हंसा वाडकर, जयश्री गडकर, माया जाधव, सुरेखा पुणेकर आदि नृत्यात निपुण अभिनेत्रींनी आपल्या पदलालित्याने ती सगळी गाणी अविस्मरणीय केली. सिमेनातील लावण्या इतक्या तुफान यशस्वी झाल्या की गांवोगांवच्या तमाशांच्या फडांमध्ये त्या बोर्डावर सादर होऊ लागल्या.

विशुद्ध शास्त्रीय नृत्याला मराठी सिनेमात फारसा वाव मिळाला नाही. कनक रेळे, रोहिणी भाटे, सुचेता भिडे, झेलम परांजपे आदि कित्येक महाराष्ट्र कन्यका अभिजात नृत्याच्या क्षेत्रात विख्यात झाल्या आहेत. पण अर्चना जोगळेकरांसारखा सन्माननीय अपवाद वगळता शास्त्रीय नृत्यात पारंगत असे अभिनेते वा अभिनेत्री मराठी सिनेमाच्या पडद्यावर विशेष दिसत नाहीत. गोपीकृष्णासारख्या कसलेल्या नर्तकाला मुख्य भूमिका देऊन बनवलेल्या झनक झनक पायल बाजे व नवरंग यासारखे नृत्यप्रधान चित्रपट मराठीमध्ये निघाले नाहीत. सिनेमातील गोष्टीमध्ये एखादा सांस्कृतिक कार्यक्रम घडवून आणून “अगं नाच नाच नाच राधे उडवूया रंग” यासारखी गाणी घालायचे तुरळक प्रयत्न झाले एवढेच.

पाश्चिमात्य संस्कृतीशी संबंध आल्यावर त्याचा प्रभाव सिनेमातील नाचगाण्यांवर पडला. “नंबर फिफ्टी फोर … हाउस ऑफ बँबू” सारखी इंग्रजी गाणी चालीसकट मराठी सिनेमात आली. तशा पद्धतीचे नाच त्याबरोबर येणारच. अलीकडच्या काळात एकसारखे कपडे घातलेले पंधरा वीस एक्स्ट्रॉ गाण्याच्या ठेक्यावर कवायतीच्या खेळासारख्या हालचाली करीत येतात. त्या नाचासाठी एक गाणे असले तरी त्यातील शब्द नीट ऐकूसुद्धा येत नाहीत आणि त्यांना कांही महत्व नसतेच. कधी कधी त्यांचा अर्थही लागत नाही आणि ती गाणी तोंडात बसतही नाहीत. त्यात नाचणारा ‘आयटम गर्ल’ हा नट्यांचा नवीनच वर्ग निर्माण झाला आहे.
लहान मुला मुलींचे नाच पूर्वीपासून चित्रपटात दिसत. या प्रकारात “भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे, दावित सतत रूप आगळे” किंवा “माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू” अशासारखी कितीतरी गाणी सांगता येतील. “नाच रे मोरा आंब्याच्या वनात” हे गाणे तर पन्नास वर्षाहून अधिक काळ जाऊनसुद्धा अजून लोकांना आवडते. आज आजीबाई झालेल्या प्रौढ वयाच्या स्त्रिया स्वतः परकर पोलक्यात असतांना या गाण्यावर नाचल्या असतील, त्यांनी आपल्या स्कर्टमधील मुलींचे नाच या गाण्यावर बसवले असतील आणि आज त्या मुली माता होऊन जीन्स व पँट्स परिधान केलेल्या आपापल्या मुलींना हेच गाणे शिकवत असतील, इतकी याची गोडी अवीट आहे.

घरोघरी, समाजजीवनात, रंगमंचावर आणि सिनेमाच्या मोठ्या किंवा टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यावर नाचाला कसे महत्व दिले जात आले आहे याचा अगदी संक्षिप्त आढावा घेण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: